Call  Sainath Kargtkar :99693 85162, Bala Ghare :9619112913, Jintendra Amberkar:9029810887,Vasudev Chendavankar :982048510

Sunday To Saturday :- 10.30 am to 12.30 pm  & 5.00 pm to 8.00 pm.
                                   

                                          

Our Location

Bhandari Samaj Santha Thane. Denis Chawl No.1 room.1 Denis Compound Sawarkar Nagar Thane 40606.

 

 

Welcome

भंडारी समाज : काल आणि आज

अनेक नामवंतानी विविध जाती धर्माचे इतिहास लिहीले आहेत. त्यानी केलेले संशोधन निश्चितपणे महत्वाचे आहे. भंडारी समाजालाही इतिहास आहे. भंडारी समाजाच्या अनेक व्यक्तींनीही समाजाची उभारणी करण्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी केली. त्या कामगिरीची इतिहासानेही नोंद घेतली आहे.

मुळात मानव वंश निर्माण झाला तेव्हा जाती भेद नव्हतेच हे सर्वाना माहित आहे. प्रथम वंश निर्माण झाले असावेत. त्यानंतर उपजीविका करण्यासाठी कामाचे भिन्न भिन्न स्वरूप निर्माण झाले असावेत. त्यातूनच जाती निर्माण झाल्या असाव्यात. वेदपाठ, पूजाअर्चा करणारे ब्राम्हण, व्यापार करणारे वाणी, सुतारकाम करणारे सुतार, गवंडीकाम करणारे गवंडी,भांड्याची कामे करणारे ते तांबट, सोन्याचांदीचे दागिने बनविणारे सोनार, लोहारकाम करणारे लोहार,चपला-बूट करणारे ते चांभार वगैरे अशा जाती निर्माण झाल्या. कालपरत्वे त्यातून असंख्य पोटजातीही निर्माण झाल्या हे सर्वानाच माहित आहे. निरनिराळ्या जातीस जी नांवे दिली आहेत ती बहुतांशी त्यांच्या उद्योग-धंद्यावरुन दिली असावीत. त्याबद्दल सविस्तर माहितीची चर्चा करण्याची येथे आवश्यकता नाही. तसेच एखाद्या पूजाविधीत किंवा मंगल कार्याच्या वेळी पुरोहित आपल्याला ‘गोत्र’ कोणते असे विचारतात. अनेक जणांना त्यांचे गोत्र माहित नसते. मन्वंतरात सांगितलेल्या सप्तर्षी गणांमध्ये सातव्या मनूच्या वेळचा पहिला महर्षी कश्यप. पुढे विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, अत्री, गौतम, वसिष्ठ आणि अगस्ती अशा सात महर्षींचा समावेश आहे. त्यांच्याच नावावरून वंशांची गोत्रे सुरू झाली. गोत्र म्हणजे त्या कुळाचा मूळ ऋषी. थोडे विस्ताराने सांगतो, गोत्र अस्तित्वात येण्याला कारण आपली रामायण-महाभारत काळी चालू असलेली गुरूकूल पध्दती होय. त्या काळी मुलांना शिक्षणासाठी रानावनात रहाणा-या ऋषीमुनींकडे लोक आपली मुले पाठवित असत. ती शिकुन आली की, अमुक अमुक ऋषीकडे आपली मुले शिकली आहेत असे मोठ्या अभिमानाने सांगत असत. ब्रिटिश काळात विद्यापीठे निर्माण झाली. जसे आपण आता सांगतो अमुकाचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले किंवा रूपारेल कॉलेजमध्ये झाले म्हणजे ते विद्यापीठ किंवा कॉलेज याची महती गुरूप्रमाणे केली जाऊ लागली. भंडारी समाजाचे मूळात उगमस्थान कोणते याबाबतही चर्चा करण्याचे कारण नाही. परंतु भंडारी समाजाची काही जुजबी माहिती तरी आजकालच्या पिढीला असायला हवी यासाठी अनेक पुस्तकांतून निवडक माहिती गोळा करून आपल्यापुढे मांडीत आहे.

जगात सुरूवातीला लोकवस्ती विरळच होती. लोक टोळ्यांनी रहात असत. एकाच जागी राहून उपजिविका भागत नसेल तेव्हा त्यानी स्थलान्तरही केले असेल. त्याच प्रमाणे पाणी हे जीवन असल्यामुळे पाण्याच्या साठ्या शेजारीच वास्तव्य करणे स्वाभाविक होते. त्यातूनच शेतीची कल्पना आली असेल. मनुष्यप्राणी अतिशय बुध्दिमान असल्यामुळे सतत आपल्या क्ल्पकतेने निसर्गाचा अभ्यास करून जगात संपूर्ण क्रांती घडवून आणली आहे. ती अजूनही घडवित आहे हे आपण पहातच आहोत.

भंडारी समाज तसा लहानसहान समाज नाही. आपल्या देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी राज्यात तो विखुरला गेला आहे. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, इसवी सनापूर्वीपासून उत्तर भारत विशेषतः, राजस्थान, गुजरात, नेपाळ येथे भंडारी समाज अस्तित्वात असावा. तेथून कारणपरत्वे सरकत सरकत दक्षिणेकडे आला तसा इतर भागातही गेला असावा. बहुतांश भंडारी हे राजस्थानमधून आले असावेत असेही म्हटले जाते. या घराण्याची नाळ राजस्थानमधील चितोडच्या शिसोदे घराण्याशी जुळते असेही म्हणतात.

इसवी सन पूर्व चारशे वर्पासून भंडारी जातीचे उल्लेख काही ग्रंथांत सापडतात. इसवी सनपूर्व ३२१-१८४ मौर्यानी ठाणे जिल्ह्यावर प्रथम आक्रमण करून कोकणात राज्य स्थापन केले. त्यावेळी मौर्यांबरोबर मोरे भंडारी आले असे महिकावतीच्या बखरीवरून कळते. तर इसवी सनपूर्व ११३८ मध्ये अहिनलवाड पाटणहून प्रताप बिंब राजा याने कोकणावर स्वारी केली त्याच्याबरोबर शेषवंशी उर्फ शिंदे भंडारी दक्षिणेत आले असे बिंबाख्यानावरून कळते. परंतु त्याबाबत ठाम मत व्यक्त करता येत नाही असेही इतिहासकारांचे मत आहे. अनेक नामवंतानी भंडारी समाजच्या उत्क्रांतीवर संशोधन करून इतिहास लिहिले आहेत. हे इतिहास अनेकांनी वारंवार वाचलेही आहेत. त्यामुळे त्याचा पुन्हा उल्लेख इथे करण्याची आवश्यकता नाही.

कराची पासून कन्याकुमारी पर्यंतच्या किनारपट्टीवर भंडारी समाजाची जास्त वस्ती होती व आहे. भंडारी लोक लढवय्ये होते. किनारपट्टीवर ज्यानी ज्यानी राज्य केले त्यांना समुद्रमार्गे येणा-या आक्रमणाला तोंड द्यावे लागत असे. अशावेळी त्याला सामोरे जाण्याचे धाडस भंडारी समाजातील लोकानी केले. समुद्र किनारी माडांची लागवड होत असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न हा त्यांचा स्वाभाविक रोजगार होता. त्यातूनच ताडी-माडीचा व्यवसाय निर्माण झाला असावा. याच पार्श्वभूमीमुळे भंडारी समाजाला इतर मागासवर्गात स्थान दिले गेले. महाराष्ट्रातील भंडारी समाजामध्ये शेषवंशी अगर शिंदे, हेटकरी, कित्ते,गावंड, थळे, चौधरी, मोरे असे आठ पोट भेद आहेत.

हेटकरी :-पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यात हेटकरी व कित्ते या दोन पोटजाती महत्वाच्या असून गोव्यातही याच पोटजातींचे वर्चस्व आहे. आता रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे बहुसंख्य हेटकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर बहुसंख्य कित्ते हे रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येतात. गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य होते तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. धर्म प्रसारासाठी त्यानी स्थानिक लोंकांची देवळे पाडली. त्यावेळी अनेक जण गोवा सोडून शेजारच्या तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात किंवा बेळगाव, कारवारकडे गेले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांचे मूळ पुरूष व कुलदेवता ह्या गोव्यात आढळतात. तत्कालीन भाषेमधील “हेट” या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यानुसार हेटकरी हे नांव या पोटजातीला पडले असावे. हेटकरी हे दर्यालढाऊ असल्याने गौतमापासून ते मौर्य, सातवाहन, कदंबापासून ते पेशवाईंच्या अखेरपर्यंच्या काळात ते आरमारी युध्दात प्रवीण बनले. स्वराज्यात या लोकांचा भरणा आरमाराप्रमाणे पायदळातही होई. हेटकरी हे शिवशाहीत व पेशवाईतही फार गाजले होते. गोव्यातील कदंब राज्याशी भंडारी आपला संबंध जोडतात. कदंब कुळीची भंडारी घराणी आपली जन्मभूमी गोमंतक समजतात.

कित्ते :- विद्यमान रत्नागिरी जिल्ह्यात कित्ते भंडारींची संख्या जास्त आहे. हेटकरी यांच्या प्रमाणे यांचेही मूळस्थान अधिकतर गोव्यातच दिसून येते. अनेकांची कुलदेवता गोव्यात आहेत. पूर्वी पोटजाती मध्येही रोटी-बेटी व्यवहार होत नसत. पण आता राजकीय पक्ष सोडून कोणीही जातीची बंधने पाळण्याचा आग्रह धरीत नाहीत. कित्ते भंडारी जात सधन आहेत. भंडारी समाजच नव्हे, तर अनेक समाजोपयोगी कार्ये कित्ते व हेटकरी समाजातील मान्यवरांनी केली आहेत व त्याची इतिहासात नोंद आहे.

थळे भंडारी :- थळे भंडारी हे रायगड जिल्ह्यातील खांदेरी थळ गांवा पासून जंजि-यातील काही गावांपर्यंत त्यांची वस्ती आहे.

गावंड भंडारी :- ठाणे जिल्ह्यातील वसई, पालघर व डहाणू तालुक्यात तसेच मुंबई शहरात गावंड भंडारी यांची वस्ती आहे.

चौधरी भंडारी : - पालघर व डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी वगैरे गावात चौधरी भंडारी यांची वस्ती आहे.

देवकर भंडारी :- पालघर, डहाणू, उंबरगाव हे महाराष्ट्रातील तालुके व गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील काही भागात देवकर भंडारीची वस्ती आहे.

शेषवंशी उर्फ शिंदे भंडारी :- मुंबई शहर, ठाणे शहर, तसेच ठाणे जिल्ह्यातील वसई तालुका, पालघर तालुका या भागात शेषवंशी उर्फ शिंदे भंडारी समाजातील लोकांची वस्ती आहे. हा समाज धनिक व सुसंकृत आहे. वसईच्या लढ्यात त्यांनी चांगलाच पराक्रम गाजवला होता. यांचा गत इतिहास शालिवाहनापर्यंत पोहचतो.

मोरे भंडारी :- मुंबई शहरांत व पालघर तालुक्यातील समुद्रलगतच्या २० गावात मोरे भंडारी यांची वस्ती आहे. मौर्याराजांबरोबर ते आले.

भंडारी समाज हा क्षत्रिय आहे हे करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी, भंडारी ज्ञातीची पूर्वपीठीका पाहून व इतर प्रकारे आपली खात्री करून घेऊन त्यांचे क्षत्रियत्व मान्य केले आहे. यावरून भंडारी समाजाच्या लोकांनी आपण क्षत्रिय आहोत याची खूण गाठ बांधावी. भंडारी समाज हा मुळातच लढवय्या आहे. या समाजाच्या पिढ्यानपिढ्या आरमारात होत्या. शिवाजी महाराज यांचे पहिले आरमार प्रमुख हे “माय नाईक भाटकर” होते. थोडेसे विस्ताराने सांगायचे तर “मायनाक भंडारी” हे नाव अपभ्रंशाने आले असावे. “माया” हे त्यांचे नांव व “नाईक” हा त्यांचा हुद्दा. त्यावेळी सैन्याची रचना अशी असे – नऊ पाईकांवरचा दहावा “नाईक”. भंडारी कुलोत्पन्न “माया” इतर कोळी, मुसलमान याना मागे सारून सागराच्या पाठीवर सरसावत होते. सागरावर पाळत ठेवताना शिवरायानीं दर्यावर्दी “माया” याना पाहिले. आपल्या नजरेने हेरले. अचूक निदान केले आणि आपले आरमार उभारल्यावर माय नाईक यांची कर्तबगारी ओळखून, दोनशे जहाजांचा एक सुभा करून, त्याना आरमारी सुभेदार केले. तो काळ होता इसवी सन १६५८. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत त्याच्या माया या नांवापुढे आदरार्थी “जी” प्रत्यय लावला आहे. त्यावरून माय नाईक भाटकर यांची समाजातील प्रतिष्ठा समजते.

भंडारी समाजाची अधिकतर वस्ती ही समुद्र किनारीच आढळून येते. ते समुद्राशी संबंधित असल्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी आरमारात होते. त्यातूनच मायाजी नाईक भाटकर यांच्या सारखे दर्यावर्दी निर्माण झाले. आजची परिस्थिती वेगळी आहे. ज्यांना समुद्र ठाउक नाही ते शीख व पंजाबी युवक मोठ्या प्रमाणात नौदलात आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये भंडारी लोक अगदी तुरळक प्रमाणात आहेत. भारतीय नौदलात आज अनेक जागा आहेत जिथे भंडारी युवक जाऊ शकतो. पण यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. आपण समुद्राशी जवळीक साधणारी माणसे आहोत. रत्नागिरीतील शिरगाव येथे फिशरीज इन्टीस्ट्यूट आहे. बारावी पास झाल्यानंतरच्या विद्यार्थ्यांना तेथे प्रशिक्षण दिले जाते. मालवण येथील भंडारी हायस्कूलची भंडारी समाजाची एक मुलगी, भंडारी हायस्कुलने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाने प्रभावित होऊन या संथेत प्रशिक्षण घेऊन मालवण येथेच फिशरीज खात्यात अधिकारी पदावर काम करीत आहे. भंडारी समाजाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे.

भंडारी समाज हा सुशिक्षित समाज आहे. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात (त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून एकच जिल्हा होता) मालवण व परिसरातील समाजधुरिणांनी भंडारी एज्यकेशन सोसायटी इ. सन १८९७ मध्ये स्थापन करून मालवण येथे प्रथम माध्यमिक शाळा सुरू केली. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील (आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील) मालवण तालुक्यात पहिले हायस्कूल सुरू करण्याचा मान भंडारी समाजाकडे जातो. आज या संस्थेचे मालवण शहरात एक बालवाडी, एक प्रायमरी हायस्कूल, एक ज्युनिअर कॉलेज असून त्या संपूर्ण विद्या संकुलाला भंडारी हायस्कूल म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला व्हर्चुअल क्लास या हायस्कूलने सुरू केला आहे. याच संस्थेची एक शाखा जवळच २२ कि. मी. अंतरावर वडाचापाट येथे असून या शाळेला राज्याचा “वनश्री पुरस्कार” सन २०१३ साली मिळाला. इंट्रॉडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम दोन्ही हायस्कूल मधून शिकविले जातात. तीन राज्यातील १३४ शाळा मधुन पहिला क्रमांक मिळविणारी वडाचा पाट येथील ही शाळा भंडारी एज्यकेशन संस्था चालवित आहे. गांडूळ खत तयार करणे, बागकाम करणे, विद्युत उपकरणांचा वापर, वेल्डींग सारखी कामे मुलीही शिकतात याचे कौतुक आहे. अनेक जण येथुन शिकुन बाहेर पडून उद्योग व्यवसाय करीत आहेत. ही समाजाच्य दृष्टीने अभिमानाची बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच शाळांनी आपल्या शाळांचे शतक महोत्सव साजरे केले आहेत. त्यापैकी भंडारी एज्यकेशन सोसायटीच्या हायस्कूने सर्वप्रथम शतक महोत्सव साजरा करण्याचा मान मिळविला आहे.

वरील शिक्षण संस्थांचा मी येथे उदाहरणे म्हणून उल्लेख केला आहे. भंडारी समाज हा शैक्षणिक बाबतीत मागे नाही, सुशिक्षित आहे. प्रगतीशीलही आहे. मुलीही मागे नाहीत. भंडारी समाजधुरिणांनी चालविलेल्या शिक्षणसंस्थाही चांगल्या प्रकारे चालल्या आहेत. भंडारी एज्यकेशन सोसायटीने मालवण येथे चालविलेली माध्यमिक शाळा आर्थिक अडचणीत होती त्यावेळी अनेक गोरगरिबानी तसेच, तेथील काजु कारखान्यात काम करणा-या भगिनींनी रोज मिळणा-या सहा पैशाच्या मजुरीपैकी एक पैशाची मदत शाळेला देऊन शाळेचा हा वृक्ष उभा केला व आपल्या दातृत्वाने शिक्षणाचे महत्व त्यावेळी पटवून दिले. मुंबईतील विक्रोळीचे प. म ऱाउत गुरूजींचे विकास हायस्कूल असो किंवा बांद्रा येथील चिंदरकर यांचे महाराष्ट्र हायस्कूल असो, खार (पूर्व) येथील सतिशचंद्र चिंदरकर यांचे अनमोल हायस्कूल असो. या संस्था नामवंत भंडारी व्यक्तींनी, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या समाजधुरिणांनी चालविल्या आहेत.

आजकालच्या शिक्षण पध्दतीबाबत मी असे सांगू इच्छितो की शाळा-कॉलेजात जाणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवणी लागतेच का? शाळा कॉलेज मध्ये जाणा-या कोणत्याही विद्यार्थाला शिकवणीला जाण्याची खरे तर गरज भासता कामा नये एवढी मेहनत खुद्द शिक्षकांनी घ्यायला हवी. गेल्या ५० वर्षाच्या काळातच ही शिकवण्या लावण्याची आणि कोचिंग क्लासेस जॉईन करण्याची पध्दत सुरू झाली आहे. आपल्यापैकी जे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, लेखक, सरकारी अधिकारी, उद्योजक या सा-यांनी महिन्यातील एक दोन तास जरी एखाद्या शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन केले तरी त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल. शिक्षण संस्था अशा पाहिजेत की, त्यानी आमच्या शाळेतील एकही विद्यार्थी कोणत्याही शिकवणीला जात नाही असे शाळाचालकांना अभिमानाने सांगता आले पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे ७० वर्षातील कालखंडाकडे दृष्टीक्षेप टाकला असता असे दिसून येते की, या कालावधीत प्रचंड प्रमाणात जलदगतीने बदल झाला आहे. याचे कारण म्हणजे सद्याचे तांत्रिक युग. यात पैशांचीही मोठी उलाढाल होत आहे. हातात पैसाही खुप खेळतो आहे. त्यातच परदेशात व्यवसाय आणि नोक-या करत असल्यामुळे आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. असे असले तरीही समाजिक बांधिलकी म्हणून समाज कार्याला मदत करण्याची प्रवृत्ती मात्र कमी झाली आहे. ७० वर्षापूर्वी दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती भागात, कित्ते भंडारी समाजाचे सभागृह व हेटकरी भंडारी मंडळाचे सभागृह, तत्कलीन भंडारी समाजातील दानशूर व्याक्तीनी बांधली. परंतु त्यानंतर पुढच्या पिढीने त्यात काहींच भर घातली नाही. शिवाजी महाराजांच्या शौर्याची तारीफ आपण सतत करतो. पण त्यानी बांधलेल्या किल्ल्यांची डागडूजी करायची म्हटली म्हणजे आपले पाय मागे पडतात. आपल्या पूर्वजानी मुंबईमध्ये दोन सभागृहे बांधली. ७० वर्षापूर्वी ३५ कोटी असलेली भारताची लोकसंख्या आज १३५ कोटी झाली त्या मानाने समाजासाठी उपयोगी पडणा-या वास्तुही आपण उभारू शकलो नाही. भंडारी समाजाच्या संस्था निर्माण होत आहेत त्या फक्त वधु-वर सूचक मंडळे चालविण्यासाठीच. फारतर, यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यासाठी, हळदी-कुंकू यासारखे कार्यक्रम करण्यासाठी व अन्य प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात सध्याच्या तरूण पिढीचा हातखंडा आहे. तांत्रिक क्षेत्रात त्यानी चांगली भरारी घेतली आहे. त्याना प्रोत्साहन देऊन योग्य मार्ग दाखविण्याचे काम ज्येष्ठांनी करावयास हवे.

१९ व २० व्या शतकात भंडारी समाजातील तीन नररत्नानी भंडारी समाजच नव्हे तर इतर समाजासाठी भरीव कामगिरी केली त्याचा उल्लेख प्रथम करतो. (१) मंबईचे शिल्पकार भागोजी बाळूजी कीर ( १८६७ ते १९४१), (२) समाज सुधारक सिताराम केशव बोले (१८६८ ते १९६१) व (३) चरित्रकार डॉ. धनंजय कीर (१९१३ ते १९८४)

(१) मंबईचे शिल्पकार भागोजी बाळूजी कीर ( १८६७ ते १९४१), दादरसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूसाठी स्मशानभूमी नाही हे लक्षात येताच सरकारकडे भूखंडासाठी विनंती न करता शिवाजीपार्क येथे प्रचंड मोठी जागा त्यावेळच्या बाजारभावाने स्वत:च्या खिशातील पैसे टाकून विकत घेतली व त्यावर तमाम हिंदूंसाठी स्मशानभूमी उभारून त्याचे लोकार्पण केले. मुंबईतील लायन्स गार्डन, ब्रेब्नॉन स्टेडिअम, मुंबई सेंट्रल स्टेशन, सेंट्रल बँक बिल्डिंग, स्टेट बँक बिल्डिंग दादरचे कित्ते भंडारी सभागृह या इमारती बांधण्यात यांचा हात आहे. तसेच रत्नागिरी येथील स्मशानभूमी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेने रत्नागिरी येथे सर्वांसाठी खुले असलेले पतितपावन पावन मंदीर व इतरही अनेक वास्तु तसेच अनेक मंदिरे, इत्यादी रत्नागिरीच्या दानशूर भागोजी बाळूजी कीर यांच्या औदार्याची व समाज सेवेची प्रतिके आहेत.

(२) समाज सुधारक सिताराम केशव बोले (१८६८ ते १९६१) अस्पृश्यता निर्मुलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केले. १९२१ साली त्यांनी कायदा परिषदेत प्रवेश केला व वकील नसतानाही कायद्याचा अभ्यास करून ८ बिले मांडली व ती गाजलीही. देवदासी प्रथेला कायद्याच्या माध्यमातून त्यानी यशस्वी आळा घातला. देशातील पहिला कामगार संघटक म्हणून त्यानी सन्मात मिळविला. सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस, ऑनररी प्रेसिन्डेंन्सी मँजिस्ट्रेट, रावबहादुर इत्यादी सनदा देऊन त्यांचा गौरव केला.

(३) चरित्रकार डॉ. अनंत विठ्ठल उर्फ धनंजय कीर (१९१३ ते १९८४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी इत्यादी महान व्यक्तींची चरित्रे मराठीतून व इंग्रजी भाषेतही लिहिली. स्वदेशात व परदेशातही ही लोकप्रिय झाली.भारत सरकारने त्याना पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले आहे.
या शिवाय भंडारी समाजात विविध क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्ती होऊन गेल्या व कार्यरत आहेतही. अनेक संस्थाही समाजासाठी भरीव कामगिरी करीतही आहेत. समाज एवढा मोठा आहे की सर्वांची नांवे येथे देणे शक्य नाही. पण माहितीसाठी काही नांवांचा उल्लेख करीत आहे.

  1. भंडारी मंडळ दादर :- मंडळाचे दादर येथे सभागृह आहे. संस्थेचे हेटकरी मासिक १९४० साली सुरू झाले. भंडारी बँकेची स्थापना या सारखी सेवाभावी कामे कै. भाईसाहेब सारंग यांच्या पुढाकाराने झाली. गरीब व हुषार मुलांना आर्थिक मदत, विनाअट व परत फेडीच्या अटीवर शिष्यृवत्या देते.
  2. कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ :- दादर येथे प्रशस्त सभागृह आहे. होतकरू विध्यार्थ्याना शिष्यवृत्या दिल्या जातात. वैद्यकीय सेवा व कायदे विषयक सल्लेही दिले जातात.
  3. भंडारी एज्यकेशन सोसायटी :- तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यात पहिली माध्यमिक शाळा १८९७ साली या संस्थेने सुरू केली. या संस्थेची मालवण येथे दोन हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे. विध्यमान अध्यक्ष, विजय पाटकर हे आहेत.
  4. अखिल भारतीय भंडारी महासंघ :- स्थापना झाल्यापासून अध्यक्ष पदाची धुरा नवीनचंद्र बांदिवडेकर वाहत आहेत. या महासंघाशी ८ राज्यातील संघटना संलग्न आहेत.
  5. इतिहासकार :- प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर, सखाराम हरी गोलतकर, प्रिं. रतन केरोबा ठाकूर वगैरेनी भंडारी समाजाचे इतिहास लिहिले आहेत.
  6. रंगभूमी व चित्रपट व दूरदर्शन :- नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मालवणी बोलीतील नाटक परदेशातील रंगभूमीवर सादर करून इतिहास घडविला. नटवर्य कै. लिलाधर कांबळी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाचे ऑस्करच्या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. महेश मांजरेकर, नाना पाटेकर, विजय पाटकर, रमेश भाटकर, सतिश पुळेकर, राजन पाटील, लवराज कांबळी, दिलिप कांबळी अशी अनेक कलावंत मंडळी या क्षेत्रात आहेत.
  7. नृत्य :-आचार्य पार्वतीकुमार कांबळी भारतीय शास्त्रीय नर्तक
  8. संगीत दिग्दर्शक :- वासुदेव गंगाराम उर्फ स्नेहल भाटकर
  9. नाट्य निर्माते :- मोहन तोंडवळकर, प्रसाद कांबळी
  10. नेपथ्यकार :- रघुवीर तळाशिलकर
  11. जादुगार :- श्रीधर कीर, मनोहर भाटकर, मनोहर नाईक
  12. क्रिकेटपटू :- विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी यांचे गुरू पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले रमाकांत आचरेकर तसेच पद्माकर शिवलकर, विजय मांजरेकर, संजय मांजरेकर, याच्या सारखे क्रीडापटूही भंडारी समाजात आहेत.
  13. उद्योजक :- दादा परूळकर यांच्या सारखे भंडारी समाजातील अनेक जण प्रिंटींग या क्षेत्रात नावाजले आहेत , पुष्कराज कोले, अण्णासाहेब तांबोस्कर यांच्या सारखे दानवीर उद्योजक भंडारी समाजातील संस्थाना हातभार लावीत आहेत.
  14. मूर्तीकार, सुलेखनकार, रांगोळी सम्राट, कलादिग्दर्शक :- गणपतीच्या सुबक मूर्ती बनविणारे मनोहर शेडगे, व्यंकटेश कांबळी, शाम सारंग; सुलेखनकार कमल शेडगे; रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर; आणि रेखाटन, जलरंग, व तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे, राजकपूर यांच्या आर. के. फिल्म्सचे कलादिग्दर्शक एम. आर. (मुरलीधर) आचरेकर
  15. डॉक्टर्स :- डॉ. विश्वनाथ हरी साळसकर, डॉ. दिनानाथ पाटकर, डॉ. श्रीरंग पाटकर, डॉ. चंद्रकांत वराडकर, डॉ. श्रीधर मांजरेकर,
  16. न्यायाधिश व वकील :- माजी न्यायाधीश पु. सी, मालवणकर, माजी जिल्हा न्यायाधिश यु.डी. मालवणकर, मनोहन कांबळी, , वकीली व्यवसायातील सौ. संजीवनी आकलेकर, भालचंद्र कांबळी, एकनाथ साळगावकर, गोपाळ नार्वेकर, तसेच
  17. प्राध्यापक, लेखक व नाटककार :- आ. ना पेडणेकर यांच्या सारखे प्राध्यापक, गंगाराम गवाणकर, प्र. ल. मयेकर
  18. विध्यापीठ :- मुबई विध्यापीठाचे विध्यमान उपकुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व दापोली कृषी विध्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर
  19. नौकानयन :- क्षेत्रातील दर्यावर्दी कँप्टन दिलिप भाटकर
  20. भाभा अँटोमिकचे :- डॉ. सदानंद मालवणकर यांनी रसायन शास्त्र व भौतिक शास्त्र याविषयावरील निबंध सादर केले.

आज जागोजागी भंडारी मंडळे आहेत. मुंबईत तर असंख्य आहेत. लोकसंख्येच्या मानाने तेही स्वाभाविक आहेत. ही मंडळे, वधु-वरांचे विवाह जुळविणे, वधु-वरांचे मेळावे घेणे, उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करणे, महिलांसाठी हळदी-कुंकूचे कार्यक्रम इत्यादी पुरतेच सीमित झाल्याचे दिसते. मंडळे अधिक असणे चांगलेच आहे. त्यामुळे अधिक जणांशी संपर्क वाढतो. पण यात स्पर्धा नको तर समन्वय असणे जरूरीचे आहे. तरच समाजाचा उत्कर्ष साधता येतो. राजकारणातही जरूर सहभाग घ्यावा. भंडारी समाजातले अनेक जण नगरसेवक, आमदार, खासदारच काय पण मंत्रीही झाले. राजकारणात जाणा-यानी शिवाजी महाराजांनी धडा घालून दिल्याप्रमाणे रयतेचे रक्षण करणे, त्यांचे पालनपोषण करणे ही तत्वे स्वीकारावीत. निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण नको. आजच्या तरूण पिढीत डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक, नाटककार, चित्रपट कलावंत, चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते संगीतकार, यासारख्या अनेकविध क्षेत्रात मोठी भरारी मारली आहे. परंतु आय. ए. एस. आणि आय. पी. एस सारख्या प्रशासनातील सर्वोच्य पदावर शिरकाव केलेला दिसून येत नाही. काही भंडारी संस्थानी त्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. परंतु त्याची भरीव प्रगती झालेली नाही. याचा जरूर विचार तरूण पिढीने करावा. ही पिढी हुषार आहे. तांत्रिक युगात आघाडीवर आहे. समाजच नव्हे, तर एकंदर मानव जातीला ही पिढी चांगली दिशा दाखविल अशी खात्री आहे.

जय भंडारी !

(वरील लेखामध्ये केलेला ऐतिहासिक बाबींचा उल्लेख केला आहे त्याला इतिहासाच्या पुस्तकांचा आधार आहे. )

ठाणे – ०१-०१-२०२१

लवू रामचंद्र नाईक
सेवानिवृत्त तहसिलदार